बंडखोर पैंथर  | Bandkhor Panther
  • November 2, 2026
  • Last Update February 13, 2026 1:37 am
  • वाशिम

अजित पवारांचा ‘अपघात’ की ‘घातपात’? रोहित पवारांनी फोडला संशयाचा बॉम्ब; नरेश अरोरा आणि ‘ब्लॅक बॉक्स’ कनेक्शनवर बोट!

अजित पवारांचा ‘अपघात’ की ‘घातपात’? रोहित पवारांनी फोडला संशयाचा बॉम्ब; नरेश अरोरा आणि ‘ब्लॅक बॉक्स’ कनेक्शनवर बोट!

मुंबई | विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघातामागे मोठे कारस्थान असू शकते, असा खळबळजनक संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. २७ जानेवारीच्या रात्री झालेली उशीरापर्यंतची बैठक, राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांच्या कंत्राटावरून झालेला वाद आणि ऐनवेळी झालेले विमान बुकिंग, या घटनाक्रमाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. हा केवळ अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित करत, त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच, रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यांनी खळबळ उडाली आहे. “अजितदादांचा अपघात झाला की घातपात?” हाच सध्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगत रोहित यांनी २७ आणि २८ जानेवारीदरम्यान घडलेल्या घटनांची साखळीच मांडली आहे. त्यांच्या मते, जर २७ जानेवारीला नियोजित बैठक वेळेत संपली असती, तर दादा पुण्याला कारने गेले असते आणि पुढील दिवशी सुरक्षितपणे बारामतीला पोहोचले असते. मात्र, त्या रात्री बैठकीला जाणीवपूर्वक उशीर करण्यात आला.रोहित पवार यांनी दावा केला की, त्या रात्री काही महत्त्वाचे फोन आले आणि एका विशिष्ट फाईलवर तातडीने स्वाक्षरी करण्याची मागणी करण्यात आली. दादांनी स्वाक्षरी केल्यानंतर सायंकाळी ७:१३ वाजता तडकाफडकी विमानाचे बुकिंग करण्यात आले. “जर विमानाने जाण्याचा निर्णय आधीच झाला असता, तर बुकिंग २६ किंवा २७ तारखेला सकाळीच व्हायला हवे होते. शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय संशयास्पद वाटतो,” असे रोहित यांनी नमूद केले. या घटनाक्रमाची आणि मुख्य पायलटने त्या काळात कोणाशी संपर्क साधला, याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाचा संबंध त्यांनी राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांच्याशी जोडला आहे. अरोरा यांच्या शेकडो कोटींच्या कंत्राटावरून अजितदादा आणि पक्षातल्या काही नेत्यांमध्ये मतभेद होते. २७ तारखेला सुनील तटकरे उशिरापर्यंत बैठकीत होते आणि त्याचवेळी प्रफुल्ल पटेल यांचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. “एका पॉलिटिकल कन्सल्टन्सीबाबत त्या बैठकीत चर्चा झाली आणि योगायोगाने त्याच कन्सल्टन्सीने संबंधित विमान विकत घेतले होते,” हा मुद्दा रोहित यांनी अधोरेखित केला. गेल्या चार महिन्यांपासून अजितदादा पक्षात एकटे पडले होते, त्यांच्यासोबत देशपातळीवरचे नेते नव्हते, असे सांगत त्यांनी पोटातील खदखद बोलून दाखवली. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएसोबत जाणार होता का? यावर सविस्तर भाष्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट घेऊन अपघाताच्या चौकशीची मागणी केली असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


रोहित पवार यांनी नरेश अरोरा या राजकीय रणनीतीकाराचे नाव घेत थेट प्रहार केला आहे. अजितदादांची भूमिका स्पष्ट होती की, “पक्ष कन्सल्टन्सीवर चालत नाही, त्यांना फक्त सर्व्हेपुरते मर्यादित ठेवा.” मात्र, पक्षातील इतर काही नेते अरोरांना कंत्राट देण्यासाठी आग्रही होते. २७ तारखेच्या रात्री याच करारावरून वाद झाला असावा आणि त्यातच बैठकीला उशीर झाला, असा दावा रोहित यांनी केला आहे. अरोरा यांच्या कंत्राटासाठी काही नेत्यांचा अट्टाहास दादांच्या जीवावर बेतला का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.


विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ ही या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कडी ठरू शकते. रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर विधान करत म्हटले की, “काही विमान कंपन्या ब्लॅक बॉक्स बंद ठेवतात, अशी माहिती मिळाली आहे. जर तपासात या विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद असल्याचे समोर आले, तर हा संशय अधिक गडद होईल.” अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्समधील डेटा निर्णायक ठरेल, मात्र तोच उपलब्ध नसल्यास हे प्रकरण घातपाताच्या दिशेने जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *